Posted by vipulnaik on 2026-03-15 14:02:15 |
Share: Facebook | Twitter | Whatsapp | Linkedin Visits: 126
छत्रपती संभाजीनगर – वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी २३ मार्च २०२६ रोजी नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) च्या मुख्यालयावर मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदाचा राजीनामा द्यावा, या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शुक्रवारी छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय सुभेदारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत आंबेडकर यांनी ही घोषणा केली. ते सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाच्या सुनावणीसाठी शहरात आले होते. सुनावणीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना अनेक महत्त्वाच्या राजकीय मुद्द्यांवर भाष्य केले.
आंबेडकर म्हणाले की, अलीकडे मुंबईमध्ये काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, आम आदमी पार्टी, डावे पक्ष आणि इतर पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली होती. या बैठकीत २३ मार्च रोजी नागपूरमधील आरएसएसच्या मुख्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. या मोर्चासाठी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे.
नागपूरलाच मोर्चा का काढला जात आहे, याबाबत स्पष्टीकरण देताना आंबेडकर यांनी सांगितले की, स्वातंत्र्य लढ्यात आरएसएसची कोणतीही भूमिका नव्हती, उलट त्यांनी ब्रिटिशांच्या बाजूने भूमिका घेतली होती. त्यांनी असा आरोपही केला की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव बहुचर्चित एपस्टीन फाईल मध्ये आल्यामुळे ते अमेरिकेसमोर पूर्णपणे कॉम्प्रमाईज झाले आहेत आणि देशाचे सार्वभौमत्व धोक्यात आले आहे.
आंबेडकर यांच्या मते, भारताचे परराष्ट्र धोरणही सध्या अपयशी ठरत आहे. त्यांनी उदाहरण देताना सांगितले की, पूर्वी भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणावर तेल खरेदी करत होता. मात्र अमेरिकेच्या दबावामुळे ते बंद करण्यात आले आणि नंतर अमेरिकेच्या परवानगीनंतरच पुन्हा रशियाकडून कच्चे तेल खरेदी सुरू करण्यात आले. “अमेरिका जसे सांगते तसेच निर्णय घेतले जात आहेत,” असा आरोप त्यांनी केला.
याशिवाय त्यांनी इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारताची भूमिका अस्पष्ट असल्याचेही म्हटले. इराण हा भारताचा मित्रदेश असूनही भारताला तेथून कच्च्या तेलाचा पुरवठा होत नसल्याचे त्यांनी सांगितले. उलट इराणकडून बांगलादेश आणि चीनला मोठ्या प्रमाणावर तेल निर्यात होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
देशात गॅसचा मोठा तुटवडा जाणवत असल्याचा आरोप करत त्यांनी सरकारवर टीका केली. सरकार काहीही सांगत असले तरी देशभरात गॅसची टंचाई जाणवत आहे, असा दावा त्यांनी केला. पुढील काही काळात बँकिंग क्षेत्रावरही संकट येण्याची शक्यता असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
या पार्श्वभूमीवर नागपूर येथे होणाऱ्या मोर्चात मोठ्या प्रमाणावर लोकांनी, विशेषतः मध्यमवर्गीयांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही आंबेडकर यांनी केले.
या पत्रकार परिषदेला युवा नेते सुजात आंबेडकर, राज्य प्रवक्ते तय्यब जफर, नगरसेवक अफसर खान, पश्चिम शहराध्यक्ष पंकज बनसोडे, युवा जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते. जिल्हा प्रसिद्धीप्रमुख भावी गवई यांनी ही माहिती दिली.